कळमनुरीत भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले; दुचाकीवरील दोन चोरटे फरार



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी : शहरात गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत विवाहित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. ही घटना १६ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर, बसस्थानकासमोर घडली.

कडपदेव येथील सुरेखा चव्हाण या त्यांचे वडील सुभाष राठोड यांच्यासोबत कळमनुरी येथे कामानिमित्त आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर दोघेही गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाच्या दिशेने पायी जात होते. त्यावेळी अचानक एका मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी सुरेखा चव्हाण यांच्या गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. हिसकावून नेलेल्या मंगळसूत्राची किमत अंदाजे ३० ते ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर तातडीने ११२ क्र. फोन करून पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच विशाल जाधव, कानबाराव हराळ, किशोर खिल्लारे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसानी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. सुरेखा चव्हाण व त्यांचे वडील सुभाष राठोड यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


No comments:

Post a Comment