टेम्भापुरी धरण : मृत्यूचा सापळा! तीन तरुणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू
वाळूज महानगर प्रतिनिधी – पांडुरंग गायकवाड दैनिक दर्पण
वाळूज परिसरातील टेम्भापुरी धरण येथे पुन्हा एकदा निष्काळजीपणा आणि सुरक्षा व्यवस्थेअभावी गंभीर दुर्घटना घडली आहे. आज दुपारी सुमारे १४.३० वाजण्याच्या सुमारास तीन तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेण्यात आली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने तिन्ही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
मृत तरुणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१) शैलेश जोगदंड (रा. परभणी)
२) शैलेश हेलसकर
३) अविष्कार लोखंडे (रा. नांदेड)
सर्व तरुणांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून ते सध्या रांजणगाव शेपू MIDC वाळूज येथील कंपनीत काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ९ जणांचा गट फिरण्यासाठी टेम्भापुरी धरण येथे आला होता. यापैकी ६ जण सुखरूप असून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर तिन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, मागील आठवड्यात याच धरणात पोहण्यासाठी आलेल्या चार जणांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार पुन्हा घडला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
धरण परिसरात कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नाही, पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज देणारी कोणतीही सूचना फलक नाहीत, तसेच बंदी असूनही नागरिकांना मुक्तपणे प्रवेश मिळत असल्याने हे ठिकाण अक्षरशः "मृत्यूचा सापळा" बनले आहे.
स्थानिक प्रशासनाने तात्काळ सुरक्षा उपाययोजना कराव्यात, धरण परिसरात बंदी कडक करावी, तसेच नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

No comments:
Post a Comment