हिंगोली-नांदेड महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर चित्ता गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. नादुरुस्त ट्रक क्रमांक  आर जे ५१ जी ए ०७९९ हा महामार्गावर उभा करून त्याची दुरुस्ती सुरू असताना भरधाव स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच १४ आर डी ९८७१ ने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार ट्रकच्या खाली पूर्णपणे घुसली.

अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कारमधून कळमनुरी येथील एका रुग्णाला उपचारासाठी हिंगोली येथे नेण्यात आले होते. रुग्णाला परत सोडून कळमनुरीकडे येत असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. खानापूर चित्ता गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकची दुरुस्ती सुरू असताना भरधाव वेगातील कार थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली. जोरदार धडकेमुळे कारमधील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सुरज सावळे रा. साईनगर, कळमनुरी व अरुण आम्ले रा. तोंडापूर समावेश आहे. ता. कळमनुरी यांचा घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

No comments:

Post a Comment