'डायल ११२' करूनही उशिरा पोहोचल्याने पोलीस निलंबित हिंगोली पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांची कारवाई
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी : डायल ११२ वर पोलीस मदतीसाठी कॉल आल्यानंतर तात्काळ न पोहोचणाऱ्या पोलीस अंमलदारास पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी त्यास गुरूवारी (दि.१४) निलंबित केले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभरोहन हे कर्तव्य कठोर व कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी हिंगोली जिल्हा पोलीस घटकातील प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नियंत्रण ठेवून नागरिकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. वेळ प्रसंगी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कठोर कार्यवाही देखील केली आहे. राज्यात महाराष्ट्र पोलीस तर्फे नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी डायल ११२ ही सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यावर पीडित व्यक्तीचा कॉल आल्यानंतर तात्काळ पोलीस मदत पाठवली जाते. तसेच कॉल आल्यानंतर कमीत कमी वेळात पोलीस मदत ही पोहोचली पाहिजे, यावर खुद पोलीस अधीक्षक यांचे विशेष व बारकाईने असे लक्ष आहे. अशा स्थितीत १२ मे रोजी पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत रात्री ८ वाजण्याच्या सुमारास डायल वन वन टू वर पोलीस मदतीसाठी कॉल आला. परंतु हा कॉल आला असता कर्तव्यावरील पोलीस अंमलदार किशोर शंकर राठोड नेमणूक कळमनुरी पोलीस ठाणे हे अगदी मर्यादित वेळेमध्ये सदर कॉलला प्रतिसाद देऊन पीडित व्यक्तीच्या मदतीसाठी पोहोचले नाही. वेळेत जाणे अपेक्षित असताना त्यांनी तब्बल दीड तास उशीर केल्याने सदरची बाब पोलीस अधीक्षक यांच्या लक्षात आली. त्यावरून डॉ. नीलाभरोहन यांनी डायल ११२ कर्तव्यावरील असलेले पोलीस अंमलदार किशोर शंकर राठोड यांना त्वरित निलंबित केले आहे.

No comments:
Post a Comment