नांदूरमध्यमेश्वर व देवगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
शासन आपल्या दारी' या संकल्पनेतून नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी निफाड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर शुक्रवार, दि.१० एप्रिल २०२६ रोजी नांदूरमध्यमेश्वर तसेच देवगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.
या प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार राहुल मुळीक, बाबासाहेब खेडकर तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, तसेच महसूल व इतर विभागांशी संबंधित प्रलंबित कामे तत्काळ निकाली काढण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, विविध दाखल्यांचे वाटप, तसेच उत्पन्न, रहिवासी, जातीचे दाखले व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, रेशन कार्डाशी संबंधित कामे, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्डाबाबत मार्गदर्शन, तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शिबिरास उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. अनेक सेवांसाठी प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार असल्याने संबंधित तलाठी किंवा ग्रामसेवकांशी पूर्व संपर्क साधल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होईल. शिबिर सकाळी १० वाजेपासून सुरू होणार असल्याने नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, नांदूरमध्यमेश्वर व देवगाव परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री.विशालजी नाइकवाडे तहसीलदार निफाड

No comments:
Post a Comment