महाड पंचायत समितीचा “पट वाढवा अभियान”ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

महाड,  : जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या वाढविण्यासाठी महाड पंचायत समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी “पट वाढवा अभियान” हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून या अभियानास तालुक्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या अभियानाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ व शनिवार दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सलग दोन दिवस तालुक्यातील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची बीटनिहाय सहा टप्प्यांत संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राजे शिवछत्रपती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या आढावा बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. प्रेरणाताई सावंत, उपसभापती श्री. सुरेशजी महाडीक, गटविकास अधिकारी श्री. उदयसिंह साळुंखे, पंचायत समिती सदस्य श्री. अनिल जाधव, श्री. संदीप खिडबिडे, सौ. रेणूकाताई देशमुख, सौ. शंकुतलाताई माने, सौ. पाचकर, माजी सभापती श्री. सिताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या सौ. मनालीताई मनोज काळीजकर, गटशिक्षणाधिकारी सौ. सुनिता चांदोरकर यांच्यासह सर्व बीट विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, अंगणवाडी विस्तार अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी सौ. सुनिता चांदोरकर यांनी अभियानाची रूपरेषा मांडताना जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच घटती पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपसभापती श्री. सुरेशजी महाडीक यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांनी समर्पणभावाने कार्य करावे, तसेच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व पदाधिकारी यांच्यात समन्वय साधून काम केल्यास शाळांची गुणवत्ता व पटसंख्या निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

पंचायत समिती सदस्य श्री. अनिल जाधव यांनी शाळांमध्ये आवश्यक बदल करून त्या दर्जेदार बनविण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्या सौ. मनालीताई मनोज काळीजकर यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत, सर्व शिक्षक प्रामाणिकपणे काम करून पटसंख्या वाढवतील, असा सकारात्मक विश्वास व्यक्त केला.

सदस्य श्री. संदीप खिडबिडे यांनी जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगितले. शाळांमधील भौतिक व शैक्षणिक सुविधांच्या कमतरतेची यादी तयार करून ती पूर्ण करण्यासाठी नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सहकार्याने CSR माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच तालुक्यातील स्थलांतर ही गंभीर समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

गटविकास अधिकारी श्री. उदयसिंह साळुंखे यांनी पटसंख्या वाढीसाठी विविध उपाययोजना सुचवून BALA पॅटर्न व CBSE धर्तीवरील शिक्षणपद्धती राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दर्जेदार शिक्षण दिल्यास पटसंख्या आपोआप वाढेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनीही शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण कमी करणे व स्थलांतराच्या समस्येवर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात सभापती सौ. प्रेरणाताई सावंत यांनी केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती कार्यक्रम तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. “महाड पॅटर्न” म्हणून हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरावे, यासाठी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षण बीट विस्तार अधिकारी श्री. सुधीर सकपाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री. वैभव कांबळे व श्री. संदीप कदम यांनी केले.

No comments:

Post a Comment