कळमनुरीत नगराध्यक्ष पदाच्या गैरवापराचा आरोप


 

नगराध्यक्षांसह पतीवर कारवाईची करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी...

प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

नगराध्यक्ष नगरपरिषदेत पदाच्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे शहरात राजकीय व प्रशासकीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, कळमनुरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद महिला आरक्षणातून निवडून आलेले असताना प्रत्यक्ष कारभारात त्यांचे पती हे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी स्वतःला 'नगराध्यक्ष'म्हणून संबोधत सोशल मीडियावर, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच शासकीय व्यासपीठावर वावर केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असून प्रशासनाची दिशाभूल होत असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, नगराध्यक्षांच्या पतीकडून शासकीय पदाचा वापर करून विविध ठिकाणी स्वतःचा प्रभाव निर्माण केला जात असल्याचा आरोप आहे. शहरात वितरित करण्यात आलेल्या कॅलेंडर, बॅनर, पोस्टर तसेच सोशल मीडियावरील प्रसिद्धीमध्ये स्वतःला 'नगराध्यक्ष' म्हणून दर्शविण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आलेआहे. या प्रकाराला 'प्रॉक्सी प्रतिनिधित्व' असे संबोधण्यात येत असून महिला आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच यामुळे धक्का बसत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यासोबतच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६३, भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० व १७१ अंतर्गत गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली व प्रशासनाला इशारा देत सांगितले आहे की, या प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या घटनेमुळे कळमनुरीत राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे, माजी तालुकाध्यक्ष राजु कांबळे, युवा तालुकाध्यक्ष शेख असलम, दिनेश पाईकराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment