जयंतीपेक्षा विचार जगणे महत्त्वाचे; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाचा पुनरुच्चार"
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आवाहन — शिक्षण, समानता आणि संविधान मूल्ये कृतीत आणण्याची गरज
प्रतिनिधी सोयगाव दिलीप मोरे...
१४ एप्रिल रोजी साजरी होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांना कृतीत उतरवणे आवश्यक असल्याचे मत तहसीलदार चंद्रकांत सरस्वती प्रकाश शेळके यांनी व्यक्त केले आहे. "जयंती साजरी करणे सोपे असते, पण विचार जगणे कठीण असते" असे सांगत त्यांनी समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली.
दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात मिरवणुका, घोषणाबाजी आणि पुतळ्यांना अभिवादन केले जाते. मात्र, बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने समाजात रुजत आहेत का, हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे शेळके यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"शिक्षण हे शस्त्र आहे" हा बाबासाहेबांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. अस्पृश्यतेच्या काळात शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभा करण्याचे मोठे कार्य बाबासाहेबांनी केले. आज शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध असले तरी त्याचे महत्त्व समाजात कितपत जाणले जाते, हा विचार करण्याचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले.
महाड सत्याग्रह, मंदिर प्रवेश आंदोलन आणि संविधान निर्मिती या बाबासाहेबांच्या संघर्षाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, हा प्रवास समानता आणि न्यायासाठीची ऐतिहासिक लढाई होती. मात्र आजही समाजात भेदभाव आणि विषमता दिसून येत असल्याने बाबासाहेबांचा विचार अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
"मी त्या धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवतो" हा बाबासाहेबांचा संदेश आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. धर्म, जात आणि भाषेच्या नावावर होणारे संघर्ष थांबवण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
युवकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा बाबासाहेबांच्या "एज्युकेट, ऍजिटेट, ऑरगनाईझ" या मंत्रानुसार काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील शिक्षण, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता या समस्या दूर करण्यासाठी बाबासाहेबांचा विचार मार्गदर्शक ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
संविधानातील समानता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगत त्यांनी जयंती हा केवळ उत्सव नसून संकल्प असल्याचे मत व्यक्त केले.
शेवटी, "भीमराव हे नाव नाही, तो विचार आहे. आणि तो विचार जिवंत ठेवायचा असेल, तर कृतीत उतरवावा लागेल" असे म्हणत त्यांनी समाजाला परिवर्तनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

No comments:
Post a Comment