एकाच नंबरवर दोन क्रुझर! महागावात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५ लाखांची गाडी जप्त
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव पोलीस स्टेशन हद्दीत एकाच नंबरचा वापर करून दोन फोर्स कंपनीच्या क्रुझर चारचाकी गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी चालविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या पथकाने धडक कारवाई करत एक वाहन जप्त केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंदे, वाहन चोरी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली आहे.
दि. १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे गुप्त माहिती संकलन करत असताना, एकाच नंबरची दोन क्रुझर गाड्या चालवल्या जात असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पथकाने फुलसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मोकळ्या जागेत छापा टाकला असता, MH-23 E 8446 या क्रमांकाच्या दोन क्रुझर गाड्या आढळून आल्या. तपासणीदरम्यान एका गाडीची कागदपत्रे सादर करण्यात आली; मात्र दुसऱ्या गाडीबाबत संबंधित इसम समाधानकारक माहिती देऊ शकला नाही.
पंचांसमक्ष तपासणी केली असता, संशयित वाहनाचा चेसिस क्रमांक खोडलेला व इंजिन क्रमांक अस्पष्ट असल्याचे आढळले. त्यामुळे वाहन चोरीचे किंवा फसवणुकीचे असल्याचा संशय बळावला.
या प्रकरणी शेख मुक्कदर शेख समी (वय ३२, रा. फुलसावंगी) याच्याविरुद्ध महागाव पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे ५ लाख रुपये किंमतीची क्रुझर गाडी जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, रविंद्र शिरामे, राजेश जाधव आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

No comments:
Post a Comment