लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा



  पारंपारिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात मिरवणुकीचे आयोजन 

प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव, 

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त लासलगाव शहर व वेळापूर येथे परिसरात भक्तिमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

शहरातील प्रमुख श्रीराम मंदिरात अभिषेक, पूजा-अर्चा, रामरक्षा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी बरोबर बारा वाजता श्रीराम जन्म सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. तसेच वेळापूर येथे रामनवमी व गवळीबाबा यात्रा असते.यावेळी गावामध्ये नांदूर मधमेश्वर येथून गोदावरीचे पाणी पायी कावड घेऊन आणले जाते सदर ते पाणी सकाळी गावात मिरवून बारा वाजता ग्रामदैवत गवली बाबा यांना जलाभिषेक केला जातो. व श्रीराम मंदिर येथे राम रक्षा पठण केले जाते. यामुळे परिसर “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

संध्याकाळी बाबा अमरनाथ बस डेपो मध्ये हनुमान चालीसा पाठ घेण्यात आला, त्यानंतर भव्य पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत एका युवकाने प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. टाळ मृदंगाच्या गजरात, अभंगांच्या तालासुरात, बाल भजनी मंडळी मुले व मुली यांनी भजनाच्या तालावर ठेका धरत मिरवणूक पार पडली. यावेळी अश्वनृत्य, वेळापूर येथील प्रताप शिव संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ व चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणुकीत महिलावर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

यावेळी श्रीराम नवमी जयंती उत्सव समितीच्या वतीने  महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच शहरात स्वच्छता व शिस्त राखण्यासाठी स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले. मिरवणुकी प्रसंगी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.श्रीराम जन्मोत्सवामुळे संपूर्ण लासलगाव परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments:

Post a Comment