अफवेमुळे कळमनुरीत पेट्रोल पंपांवर अभूतपूर्व गदी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई इशारा
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरीः शहरात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा अचानक पसरल्याने कळमनुरीत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. या अफवेचा परिणाम म्हणून शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनचालकांनी एकच गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.
अनेक नागरिकांनी भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीने गरजेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तर काही पेट्रोल पंपांवर तात्पुरती इंधन टंचाई जाणवली, मात्रही टंचाई प्रत्यक्षात नसून केवळ अफवेमुळे निर्माण झालेली परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शहरात इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता सयम राखावा व अफवा पसरवू नये असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच खोटी माहिती पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. एकूणच, अफवेमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments:
Post a Comment