ज्ञानमंदिरातच अज्ञानाचा अंधार? – न येताही विद्यार्थ्याला पास; शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह



प्रतिनिधी महागांव अक्षय डोंगरे दर्पण वार्तापत्र 

महागांव :जिथे अक्षरांचा प्रकाश उजळायला हवा, तिथेच अज्ञानाची सावली दाटून येत असल्याचा धक्कादायक प्रकार महागावातील मातोश्री प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उघडकीस आला आहे. शिक्षणाच्या मंदिरातच गुणवत्ता हरवत चालल्याचे चित्र समोर येत असून, एका विद्यार्थ्याच्या उदाहरणाने संपूर्ण व्यवस्थेलाच प्रश्न विचारले आहेत.

सहावी (सेमी इंग्लिश) मध्ये शिक्षण घेणारा संस्कार विजय देवरकर हा विद्यार्थी साधे इंग्रजी वाचनही करू शकत नसतानाही त्याला पुढील वर्गात उत्तीर्ण करण्यात आल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. ही बाब उघड होताच पालकांच्या मनात आश्चर्य, संताप आणि चिंता यांचे वादळ उसळले आहे.

विद्यार्थ्याचे वडील विजय देवरकर यांनी शाळेत जाऊन लेखी तक्रार देत प्रशासनाला जाब विचारला आहे. “मुलाला काहीच येत नसताना त्याला पास कसे केले?” हा त्यांचा थेट सवाल केवळ एका शाळेपुरता मर्यादित नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेलाच आव्हान देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे, मुलगा अभ्यासात मागे असल्याची कोणतीही सूचना शाळेकडून कधीच देण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

करंजखेड येथून महागावात शिक्षणासाठी दाखल केलेल्या या विद्यार्थ्याची खरी शैक्षणिक पातळी घरी वाचन घेतल्यावर समोर आली आणि पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पुस्तक हातात असूनही अक्षरांशी मैत्री न जमलेला विद्यार्थी पुढच्या वर्गात गेला, ही वस्तुस्थिती शिक्षणातील पोकळी अधोरेखित करणारी आहे.

या घटनेनंतर शाळेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ फीच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना न तपासता पुढे ढकलले जात असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. “शिक्षणाचा दर्जा घसरला असून मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ज्ञान देण्याची जबाबदारी असलेल्या संस्थांनीच जर तडजोडीचा मार्ग स्वीकारला, तर उद्याच्या पिढीचे भविष्य कोणाच्या हाती सुरक्षित राहणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

तक्रारीनंतर शाळा व्यवस्थापन समितीकडून पालकांना समजावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली असली, तरी यामुळेच संशय अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाच्या देखरेखीबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळांची नियमित तपासणी होते का? गुणवत्तेची कसोटी लावली जाते का? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात घोंगावत आहेत.

या पार्श्वभूमीवर पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे ठोस मागणी केली आहे की, शाळेची तातडीने सखोल चौकशी करून सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

दरम्यान, या घटनेमुळे इतर पालकांमध्येही चिंतेची लाट पसरली आहे. “आपल्या मुलांना खरोखर काय येते?” हा प्रश्न आता प्रत्येक घरात उमटू लागला आहे. एकंदरीत, ही घटना केवळ एका विद्यार्थ्यापुरती मर्यादित नसून, शिक्षणाच्या पाया ढासळत असल्याचा इशारा देणारी ठरत आहे. आता या अंधारात प्रकाश पाडण्याची जबाबदारी प्रशासन आणि समाज या दोघांचीही आहे.


No comments:

Post a Comment