वीजतारांच्या निष्काळजीपणाने घेतला घास; कापणीच्या उंबरठ्यावरचे पीक आगीत भस्म



प्रतिनिधी सोयगाव...दिलीप मोरे..


दिं २१ रोजी वीज वितरण यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे सावळदबारा शिवारातील गट क्रमांक १०८ मध्ये भीषण आग लागून एका शेतकऱ्याचे सुमारे ३ ते ३.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक क्षणात जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेतकरी दिनकर आबाराव मोरे यांनी त्यांच्या चार एकर शेतीत दोन एकर मका व दोन एकर गहू अशी लागवड केली होती. मका काढणीसाठी तयार ठेवलेला होता, तर गहूही कापणीच्या उंबरठ्यावर होता. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विजेच्या तारा एकमेकांवर आदळून शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून उसळलेल्या ठिणग्यांनी काही क्षणातच शेतात आग पसरली.

शेजारील गट क्रमांक १०६ मधील शेतकरी गजानन आप्पा कुल्ले हे त्या वेळी शेतातच होते. त्यांनी प्रत्यक्ष ठिणग्या पडताना पाहून तातडीने इतर शेतकऱ्यांना फोनद्वारे कळवले. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आगीने झपाट्याने फैलाव घेतला.घटनास्थळी गावातील ५० ते ६० नागरिकांनी धाव घेतली, परंतु आगीची तीव्रता इतकी होती की सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. या आगीत मका व गहू पिकांसह दोन स्प्रिंकलर संच व ठिबक सिंचन व्यवस्था पूर्णपणे जळून नष्ट झाली.या घटनेबाबत शेतकरी दिनकर मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले,

 “वीजतारा खाली लोंबकळत असल्याबाबत मी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. अधिकाऱ्यांना फोटोही पाठवले होते. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे माझे मोठे नुकसान झाले.”तसेच प्रत्यक्षदर्शी शेतकरी गजानन कुल्ले म्हणाले,“तारांमधून ठिणग्या पडताच लगेच आग लागली. वाऱ्यामुळे आग क्षणात पसरली. आम्ही लोकांना कळवले, पण तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती.”

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

शेतकऱ्याची मागणी:तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई जाहीर करावी निष्काळजी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी

No comments:

Post a Comment