वेगाच्या एका चुकीने विझला तरुणाचा दिवा… युवकांनो, सावध व्हा!”


दैनिक दर्पन प्रतिनिधी.वाळुंज महानगर पांडुरंग गायकवाड

वाळूज :भरधाव वेग, क्षणभराचा निष्काळजीपणा आणि आयुष्यभराची पोकळी… अशी हृदयद्रावक घटना वाळूज परिसरात घडली. दुचाकीवरून जात असताना मालवाहू ट्रकच्या जोरदार धडकेत एका तरुण विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास इसारवाडी–बिडकीन रस्त्यावर घडली.

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा दत्तात्रेय म्हस्के (वय १५, रा. मुर्शिदाबाद, ता. गंगापूर) असे आहे. तो शिक्षणासाठी शेंदूरवाडा येथील शाळेत जात होता. एमएच २० एफडी ६६८८ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना कंटेनर ट्रकने (आरजे १९ जीके ३५८५) जोराची धडक दिली. या धडकेत कृष्णा चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत केली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कृष्णाचा मोठा भाऊ दिव्यांग असल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

⚠️ युवकांसाठी संदेश :

ही घटना केवळ एक अपघात नाही, तर प्रत्येक युवकासाठी इशारा आहे.

वेग, मोबाईलचा वापर, निष्काळजीपणा — हे सगळं आयुष्य हिरावून घेऊ शकतं.

👉 रस्त्यावर चालताना आणि वाहन चालवताना नियम पाळा

👉 हेल्मेटचा वापर करा

👉 वेगावर नियंत्रण ठेवा

कारण… एक क्षणाची चूक, संपूर्ण आयुष्य संपवू शकते. 

No comments:

Post a Comment