सावळदबारा शिवारात बिबट्याचा हल्ला; शेतकरी महिलेच्या सहा शेळ्या ठार
संरक्षण जाळी फाडून गोठ्यात घुसला बिबट्या; वनविभागाकडून पंचनामा
प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे...
तालुक्यातील सोयगाव येथील डाभा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेच्या सहा शेळ्या ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. ९ मार्च) उघडकीस आली.डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव–सावळदबारा मार्गालगत गट क्रमांक ८२ मध्ये आहे. शेळीपालनासाठी त्यांनी शेतात टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावली होती. मात्र रात्रीच्या सुमारास बिबट्याने ही जाळी फाडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड अशा एकूण सहा शेळ्यांना ठार केले.
खोलीमध्ये लावलेल्या पार्टिशन जाळीमुळे इतर काही शेळ्या बचावल्या असल्या तरी या घटनेत संबंधित शेतकरी महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.हा परिसर अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी असल्याने येथे बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांची वर्दळ वारंवार होत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. मागील काही महिन्यांपासून अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी , वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या घटनेमुळे हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना मोठा आर्थिक फटका बसला असून वनविभागाने तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment