यमुनाबाई कुऱ्हे बीएड महाविद्यालयात "AI चा शिक्षणातील वापर व महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी" निमित्त सेमिनार चे आयोजन.



दर्पण न्यूज (नेवासा) प्रतिनिधी नवनाथ घावटे.

यमुनाबाई कु-हे बी एड महाविद्यालय वडाळा बहिरोबा येथे “AI चा शिक्षणातील वापर व ग्रामीण भागातील महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी” या विषयावर एक दिवसीय विद्यार्थी सहभाग सेमिनार उत्साहात पार पडला. या सेमिनारचे आयोजन बीएडच्या कोर्स कोड २०६ अ अंतर्गत विद्यार्थ्यामार्फत करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव गोरक्षनाथ कु-हे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तसेच अध्यक्षस्थान प्रा मंडलिक पी डी यांनी स्विकारले . यावेळी सहभागी विद्यार्थ्यानी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शिक्षण क्षेत्रातील वाढता वापर, अध्यापनातील नवकल्पना, तसेच डिजिटल साधनांमुळे शिक्षण अधिक प्रभावी कसे होते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी AI च्या साहाय्याने वैयक्तिक शिक्षण (Personalized Learning), ऑनलाईन मूल्यांकन आणि स्मार्ट क्लासरूम यांसारख्या संकल्पनांची माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात “ग्रामीण भागातील महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी” या विषयावर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली. या सत्रात विद्यार्थ्यांनी ग्रामीण महिलांना शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा, तसेच समाजातील बदलत्या दृष्टिकोनाचा सकारात्मक प्रभाव यावर प्रकाश टाकला. त्यांनी महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

सेमिनारमध्ये विद्यार्थी-शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध गटचर्चा, सादरीकरणे आणि प्रश्नोत्तर सत्रांमधून विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. यामुळे उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण झाली तसेच नवीन दृष्टीकोन विकसित झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी खाटिक मीरा यांनी सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या सेमिनारमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाली असून ग्रामीण महिलांच्या शिक्षणाबाबत संवेदनशीलता वाढल्याचे मत प्रा घावटे बी सी यांनी व्यक्त केले.


No comments:

Post a Comment