धर्माभिमानी हिंदूंचा महामेळावा



 खेडलेझुंगेत घुमला 'जय श्रीराम'चा जयघोष. १११ फुटी हनुमंताच्या साक्षीने खेडलेझुंगेत हजारो हिंदूंनी घेतली संघटनशक्तीची शपथ... धर्म संस्कृती आणि एकतेसाठी एकत्र या - महंत रामगिरी महाराज

प्रतिनिधी / गणेश ठाकरे लासलगाव 

"हिंदू धर्म आणि संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज असून, मूल्यांच्या संवर्धनासाठी समाजाने संघटित होणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन सरला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले. खेडलेझुंगे येथील प्रसिद्ध १११ फूट अभय वरद हनुमान मूर्तीसमोर (नक्षत्रवन) आयोजित भव्य 'हिंदू महासंमेलनात' ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

हिंदू संमेलन समिती देवगाव व खेडलेझुंगे यांच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक संमेलनाची सुरुवात सायंकाळी ४:३० वाजता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या भजनाने झाली. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि संत पूजन करण्यात आले. यावेळी 'जय श्रीराम', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'धर्मवीर संभाजी महाराज की जय' आदी महापुरुषांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण खेडलेझुंगे परिसर दुमदुमून गेला होता.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे (ठाणे जिल्हा) अध्यक्ष ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "आपला परिवार हीच आपली शक्ती आहे, मात्र विदेशी शक्तींमुळे कुटुंब विभक्त होत आहेत. लव्ह जिहादसारख्या कारणांमुळे हिंदू परिवार विस्कळीत होत असून, मुलींची संख्या कमी होणे ही चिंतेची बाब आहे. भारताला पुन्हा विश्वगुरू बनवण्यासाठी आणि हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि सम्राट अशोक यांचेसह अनेक महापुरुषांच्या विचारांची शपथ घेऊन सर्वांनी संघटित व्हावे असे आवाहन केले."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी चंद्रकांत घरोटे यांनी समाज प्रबोधन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर केशव महाराज शास्त्री यांनी धर्माची व्याख्या स्पष्ट करून अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग सांगितला. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत माहिती दिली. प्रत्येक गावात संघाच्या शाखा सुरु करून जनतेची व देशाची सेवा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी अमृता पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या महासंमेलनासाठी निफाड, सिन्नर, कोपरगाव तालुक्यातुन हजारो हिंदू बांधव उपस्थित होते. यावेळी महिलांची व तरुणांची उपस्थिती लक्षनीय होती. १११ फूट हनुमान मूर्तीसमोरचा परिसर जनसागराने पूर्णपणे फुलून गेला होता. पसायदान आणि जयश्री राम च्या जय घोषनेने कार्यक्रमांची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेडलेझुंगे देवगाव हिंदू संमेलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील प्रमुख प्रवेशद्वारांवर करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था आणि स्वयंसेवकांच्या चोख नियोजनामुळे एवढी मोठी गर्दी असूनही शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला. रात्री ८:०० वाजता या ऐतिहासिक संमेलनाची सांगता झाली. अशा आयोजनामुळे समाजात एकीची भावना निर्माण होऊन संस्कृतीचे रक्षण होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कोणताही अनुचित प्रसंग ओढवू नये यासाठी लासलगाव पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन येथील संघाचे स्वयंसेवक पंकज घोटेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment