उत्खनन यंत्राच्या सहाय्याने सरकारी नाल्यावर अतिक्रमण ;  वनखात्याची परवानगी न घेताच जुने चिंचेचे झाड जमीनदोस्त  - शेतकऱ्याचा प्रताप

 




प्रतिनिधी. :- गणेश ठाकरे लासलगाव 

 विंचूर जवळील विष्णूनगर शिवारातील गट क्रमांक १४६ मधून जाणाऱ्या सरकारी नाला व सार्वजनिक रस्त्यावर एका शेतकऱ्याने उत्खनन यंत्राच्या सहाय्याने नाला अरुंद करत अतिक्रमण केल्याचा प्रताप केला आहे. यामुळे अधिकृत सार्वजनिक रस्ता बंद झाला असून शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.

  सदर शेतकऱ्याने सरकारी नाल्याची रुंदी कमी करून त्यात माती टाकल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविला गेला आहे. परिणामी आगामी पावसाळ्यात शेतजमिनींमध्ये पाणी साचण्याचा तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या प्रकरणी ग्रामस्थांनी मंडळ अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला असूनही अद्याप साधी स्थळ पाहणीसुद्धा न झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या कारवाईदरम्यान कोणतीही शासकीय परवानगी नसताना सुमारे पन्नास वर्षांचे चिंचेचे झाड तोडून जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

     या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून सरकारी नाल्यावर व सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरित हटवावे, बेकायदेशीर झाडतोड प्रकरणी स्वतंत्र कारवाई करावी तसेच दोषींवर कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.

याबाबत तलाठी व मंडळ अधिकारी यांना चौकशी करण्यास सांगितले असून दोन दिवसात तलाठी व मंडळ अधिकारी सदर जागेची पाहणी करून विषय मार्गी लावतील - विशाल नाईकवाडे तहसिलदार, निफाड


No comments:

Post a Comment