पवित्र रमजान : मानवतेचा, संयमाचा आणि ऐक्याचा संदेश देणारा उत्सव
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
रमजान हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित महिना नाही; तो संपूर्ण मानवजातीला आत्मपरीक्षण, संयम आणि करुणेचा संदेश देणारा आध्यात्मिक पर्व आहे. श्रद्धा वेगवेगळ्या असल्या तरी मूल्ये सार्वत्रिक असतात आणि रमजान ही त्याची जिवंत अनुभूती आहे.
इस्लाम धर्मात रमजान अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत रोजा पाळला जातो. पण रोजा म्हणजे केवळ भूक-तहान सहन करणे नव्हे; तो मनावर, वाणीवर आणि कृतीवर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प आहे. राग, द्वेष, अन्याय आणि अहंकार यांपासून दूर राहण्याची ही साधना आहे.
इस्लामी परंपरेनुसार प्रेषित मुहम्मद यांनी सांगितले आहे की “रोजा हा ढाल आहे.” म्हणजेच रोजा माणसाला वाईट प्रवृत्तींपासून वाचवतो आणि त्याला अधिक सजग, संयमी व संवेदनशील बनवतो. ही शिकवण कोणत्याही धर्माच्या चौकटीत अडकत नाही; ती प्रत्येक माणसासाठी तितकीच उपयुक्त आहे.रमजानचा खरा गाभा आहे - “वाटणे आणि जोडणे.” “जो इतरांना अन्न देतो त्याला रोजेदाराइतकेच पुण्य मिळते,” असा संदेश देत हा महिना दान, मदत आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देतो. गरजूंना सहकार्य करणे, उपाशीपोटी झोपणाऱ्यांना अन्न देणे, आणि दुःखी मनांना आधार देणे — हीच खरी उपासना ठरते.
आजच्या ताणतणावाच्या, विभाजनाच्या काळात रमजान आपल्याला आठवण करून देतो की माणुसकी हीच सर्वांत मोठी ओळख आहे. धर्म वेगळे असले तरी प्रेम, सहिष्णुता आणि ऐक्य हीच खरी शक्ती आहे.म्हणूनच रमजान हा फक्त मुस्लिम समाजाचा सण नाही; तो सर्वांनी वाचावा, समजून घ्यावा आणि आचरणात आणावा असा मानवी मूल्यांचा उत्सव आहे.
संयमाने जगणे, करुणेने वागणे आणि प्रेमाने समाज घडवणे हाच रमजानचा सार्वत्रिक संदेश आहे.

I felt really happy reading this. Seeing someone talk about Ramadan with such positivity and understanding means a lot. Thank you for considering and respecting our traditions.
ReplyDelete