महागावात शिवजयंतीनिमित्त बालगोपाळांची भव्य सायकल रॅली शहरात उत्साहाचे वातावरण
प्रतिनिधी महागाव अक्षय डोंगरे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महागाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बालगोपाळांनी उत्साहात सायकल रॅली काढत शिवरायांना अभिवादन केले. या उपक्रमामुळे शहरात दिवसभर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅलीत शहरातील लहान मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हातात भगवे झेंडे, डोक्यावर फेटे आणि काहींनी शिवकालीन वेशभूषा परिधान करून रॅलीत सहभाग नोंदविला. शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. नागरिकांनी ठिकठिकाणी उभे राहून बालगोपाळांचे कौतुक केले.
रॅलीदरम्यान शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. लहान वयातच शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. नवीन पिढीत देशभक्तीची भावना व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, हा यामागील मुख्य हेतू होता. रॅली शिस्तबद्ध व शांततेत पार पडली. वाहतूक व्यवस्थेची काळजी घेत योग्य नियोजन करण्यात आले होते. पालक व नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत मुलांना प्रोत्साहन दिले. शिवजयंतीनिमित्त शहरात इतरही लहान मोठे कार्यक्रम पार पडले. एकूणच महागाव शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

No comments:
Post a Comment