महागावात अवैध मटका व्यवसायाविरोधात संयुक्त तक्रार कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा



प्रतिनिधी महागाव अक्षय डोंगरे 

महागाव तालुका व शहर परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत संयुक्त तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात महागाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले असून संबंधितावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात काही ठिकाणी उघडपणे मटका व्यवसाय सुरू असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. या अवैध धंद्यामुळे युवक, विद्यार्थी तसेच कष्टकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत आहेत. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

मटका व्यवसायामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून गुन्हेगारी प्रवृत्तींनाही खतपाणी मिळत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस प्रशासनाने तात्काळ छापेमारी करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अवैध मटका अड्डे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, तसेच या धंद्याला पाठबळ देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी भूमिका तक्रारदारांनी घेतली आहे.

या तक्रारीची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. नागरिकांमध्ये वाढत चाललेल्या नाराजीमुळे अवैध व्यवसायावर अंकुश लावणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.




No comments:

Post a Comment