कृषी संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी ठोस प्रयत्न करणार डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ
प्रतिनिधी. :- गणेश ठाकरे लासलगाव
सन २०३२ मध्ये कृषी संशोधन केंद्राला १०० वर्षे पूर्ण होणार असून, या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या सर्वांगीण बळकटीकरणासाठी आत्तापासूनच नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. खर्चे यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी रविवार दि.२५ जाने.रोजी कुंदेवाडी (ता. निफाड) येथील कृषी संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्राची पाहणी करून केंद्रातील संशोधन, सुविधा व उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
निफाडचे कृषी संशोधन केंद्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील एक महत्त्वाचे संशोधन केंद्र असून या केंद्रामार्फत आतापर्यंत एकूण ३२ गव्हाच्या जातींचे संशोधन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रसार प्रभावीपणे केला जात आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, जिवाणू खते, जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती प्रयोगशाळा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे डॉ. खर्चे यांनी स्पष्ट केले. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान विकसित करणे, ते तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांच्या समस्यांनुसार संशोधन करणे आवश्यक असल्यावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, सहयोगी संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील (विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी), तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल (कापूस पैदासकार), प्रा. भालचंद्र मस्के (गहू विशेषज्ञ), डॉ. निलेश मगर (गहू पैदासकार) व डॉ. भरत मालुंजकर (प्रक्षेत्र व्यवस्थापक) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भालचंद्र मस्के यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. निलेश मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. भरत मालुंजकर यांनी केले. यावेळी कृषी संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment