थेटाळे ता.निफाड येथे मध्यरात्रीत धक्कादायक घटना


 

 विहिरीत आढळला पती - पत्नीचा मृतदेह ;  तीन अपत्यांवर दुःखाचा डोंगर ; परिसरात हळहळ 


प्रतिनिधी  गणेश ठाकरे लासलगाव 

 थेटाळे ता.निफाड येथे मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत तरुण पती - पत्नीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तीन अपत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.    

याबाबत माजी पोलिस पाटील बाळकृष्ण पर्वत पवार यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात खबर दिली की, दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मयतांचे शेत गट क्रमांक ११४ मधील विहिरीत योगेश भाऊसाहेब शिंदे (वय ३५) व पत्नी सोनाली सोगेश शिंदे (वय ३२) हे दोघेही बुडालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल राठोड यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अ. मृत्यू रजि. नं. ६३/२०२५ भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायदा कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. सदर घटना ही घातपात आहे की आत्महत्या याबाबत तर्क वितर्क लावले जात असून, याबाबत लासलगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.


 एकाच वेळी पती - पत्नीचा मृत्यू झाल्याने व त्यांचे पश्चात तीन अपत्ये अनाथ झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment