प्रियदर्शनी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा

महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव :- प्रियदर्शनी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. “भारत देश एकतेसाठी ओळखला जातो” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी भारताची विविधता आणि एकता यांचे सुंदर दर्शन घडवले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशातील विविध राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान करून भारतातील सांस्कृतिक विविधतेचे प्रभावी सादरीकरण केले. नृत्य, गीत, भाषणे व छोट्या नाटिकांच्या माध्यमातून “एक भारत, श्रेष्ठ भारत” हा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भारतातील भाषा, संस्कृती, परंपरा व ऐक्य यांचे जिवंत चित्र उभे राहिले. पालक व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली. प्रियदर्शनी कॉन्व्हेंट स्कूलने प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून भारताची विविधता म्हणजेच भारताची ताकद हा संदेश प्रभावीपणे दिला. 🇮🇳
No comments:
Post a Comment