छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेचाच भगवा फडकणार--मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
दर्पन वृत सेवा. . पांडुरंग गायकवाड
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही सेंटर मैदानावर भव्य जाहीर सभा घेत शहरात राजकीय वातावरण तापवले. औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर या नामांतरानंतर होणाऱ्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण सत्तेत येणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करणारे आजही हिंदुत्वाचा मुखवटा घालून मत मागत आहेत. पण खरी शिवसेना कोणाची आहे, हे जनतेने आधीच दाखवून दिले आहे. आता महापालिकेतही त्याची पुनरावृत्ती होणार आहे.”
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. “मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, पण काही लोक ती कापायला निघाले आहेत. मुंबईकर त्यांना धडा शिकवतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “हा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, प्रभू श्रीराम आणि हिंदुत्वाचा प्रतीक आहे. संभाजीनगरच्या हृदयात खोट्या हिंदुत्वाला जागा नाही.”
आपल्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करत शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ ही गरीब, कष्टकरी महिलांसाठी दिलेली सन्मानाची हमी असल्याचे सांगितले. “कोर्टात आव्हाने आली, विरोध झाला, पण माझ्या लाडक्या बहिणींनी मतांच्या जोरावर त्यांना उत्तर दिले,” असेही ते म्हणाले.
2022 नंतर शिवसेनेने राज्यभरात 70 नगराध्यक्ष आणि सुमारे 1400 नगरसेवक निवडून आणल्याचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले की, “खरी शिवसेना कोणाची आहे हे जनतेने पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे.”
सभेच्या शेवटी त्यांनी शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण करून देत, संभाजीनगरमध्ये राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी शिवसेनेलाच सत्ता देण्याचे आवाहन नागरिकांना केले.

No comments:
Post a Comment