पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना निफाडचा भूकरमापक रंगेहात अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आडगाव शिवारात कारवाई




प्रतिनिधी - गणेश ठाकरे लासलगाव, दि.७


 निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला वर्ग ३ भूकरमापक दिनेश शिवनाथ झुंजारे याला पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई बुधवार दि.७ जाने.२०२६ सकाळी आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा पॉईंटजवळ करण्यात आली.

          मूळ तक्रारदार राहुल ढोमसे यांच्या वहिनी प्रतिभा साळुंखे/ ढोमसे यांच्या नावावरील मौजे गोरठाण येथील शेतगट क्रमांक १३६ मधील ५७ आर क्षेत्राची द्रुतगतीने हद्द कायम जमीन मोजणी करून त्याचा नकाशा देण्यासाठी झुंजारे याने पस्तीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, निफाड येथे अर्ज केल्यानंतर दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी पंचांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नकाशाची प्रत देण्यात आली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. दि. ६ जानेवारी २०२६ रोजी झुंजारे याने तक्रारदाराला फोन करून नकाशा तयार असल्याचे सांगत तो देण्यासाठी पस्तीस हजार रुपये आणण्याची मागणी केली.

 त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीअंती सापळा रचण्यात आला. दि.७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा पॉईंट जवळील अमृततुल्य चहा दुकानाच्या शेजारी झुंजारे याने तक्रारदाराकडून पस्तीस हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. 

    या कारवाईत पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, चव्हाण आदी अधिकारी सहभागी होते. 

       याप्रकरणी फिर्यादी सरकारतर्फे अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी आडगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा आबुज अधिक तपास करीत आहेत




No comments:

Post a Comment