निफाड तालुक्यातील मंदिरात चोरीचे सत्र सुरूच सायखेडा येथील लक्ष्मी नारायण मंदिरात चोरी; मौल्यवान ऐवज लंपास फिंगरप्रिंट व डॉग स्क्वॉडची तपासणी



प्रतिनिधी  :-  गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुक्यातील  मंदिरात चोरीची सत्र काही केल्या थांबत नाही. काही दिवसांपूर्वी शिवापूर, देवगाव, नैताळे पाठोपाठ आता सायखेडा येथील लक्ष्मी नारायण मंदिरातील मौल्यवान वस्तू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. निफाड तालुक्यात देवस्थानांना लक्ष्य करण्याच्या सलग घटना घडत असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या असून पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

     फिर्यादी पुजारी सुमित जगदीश तिवारी वय ३८, रा.सायखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीत, मंदिराच्या दरवाज्याची एक चावी माझ्याकडे असते व दुसरी चावी मंदिरासमोरील तटबंदीजवळील वीज वितरणच्या पेटीत ठेवलेली असते. दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता मी मंदिर उघडल्यावर मौल्यवान साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर समोरील दुसरी चावी ठेवलेला वीज वितरणची पेटी उघडलेली व चावी खाली पडलेली दिसली. घटनेबाबत मी मंदीराचे आर्थिक खर्च पाहणारे श्रीनिवास काशीनाथ काबरा, रा.सायखेडा तसेच मंदिराचे वारसदार सर्वेश मालपाणी, रा. वावी आणि संतोष केला, रा.गांधीनगर, नाशिक रोड यांना विचारले असता, त्यांना काही माहिती नसल्याचे सांगितले.

 अज्ञात चोरट्याने पेटीतील चावी वापरून मंदिराचे कुलूप उघडून दि.१० डिसें २०२५ रोजी सायं ६.३० वाजेपासून ते दि.११ डिसें २०२५ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आत प्रवेश केला. मंदिरातून २० ग्रॅम वजनाची २१०० रु.किमतीची चांदीची साखळी, ३५ ग्रॅम वजनाची ३५०० रु.किमतीची चांदीची पिंड, नऊ किलो वजनाचा ४,५०० रु.किमतीचा पितळी घंटा, १ हजार रु.किमतीची पितळी पंचारती तसेच देवीच्या मूर्तीवरील १ ग्रॅम सोन्याचे ९५०० रु.किमतीचे मणी मंगळसूत्र असा एकूण २०,६०० रू.किमतीचा ऐवज चोरून नेला असे म्हटले आहे. त्यांचे फिर्यादीवरून सायखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गु.र.नं. २३३/२०२५ भा.दं.वि. कलम ३०३(२) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


 घटनेची माहिती मिळताच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील आणि स.पो.नि.संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिंगरप्रिंट युनिट व डॉग स्क्वॉडनेही तपासणी केली असून पुढील तपास पो. हवा. अजय नाईक करीत आहेत.

No comments:

Post a Comment