गडकरी साहेब, जेवायला या, आमचा पूल वाचवा
प्रतिनिधी अक्षय डोंगरे | महागाव
ज्या मार्गावरून नामदार नितीन गडकरी जाणार असतात, त्या भागातील रस्ते आणि पूल प्रशासन एका रात्रीत चकाचक करून देते, 'या लोकचर्चेचा आधार घेत महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील एका तरुणाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना चक्क "वन भोजनाचे" निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण केवळ भोजनापुरते मर्यादित नसून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या पुस नदीवरील पुलाची डागडुजी व्हावी, याकरिता पुकारलेला हा एक अनोखा एल्गार आहे. हिवरा (संगम) येथील रहिवासी हरीश भीमराव कामारकर यांनी नितीन गडकरी यांना पाठवलेले हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचाविषय ठरत आहे. या पत्रात त्यांनी विदर्भाच्या मातीतला पाहुणचार आणि शेतातल्या गावरान मेजवानीचा उल्लेख करत गडकरींना हिवरा परिसरात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, 'साहेब, हे पत्र कोणत्याही तक्रारीसाठी नाही, तर एका प्रेमाच्या आग्रहासाठी आहे. शेतातली ताजी तुरीची आमटी, हरभऱ्याची भाजी आणि चुलीवरची गरम ज्वारीची भाकर असा बेत तयार आहे.
आपण वेळ काढून या वनभोजनाचा आस्वाद घ्यावा, ही गावकऱ्यांची इच्छा आहे. मात्र, या निमंत्रणामागे एक अत्यंत गंभीर आणि वेदनादायी वास्तव दडलेले आहे. नितीन गडकरी हे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा (संगम) जवळ पुस नदीवर एका पुलाची उभारणी केली होती. हा पूल परिसरातील १० ते १५ खेड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या पुलाचे संरक्षक कठडे तुटलेले असून पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पथदिव्यांचा अभाव आणि रस्त्याची झालेली चाळण यामुळे हा पूल आता "मृत्यूचा सापळा' बनला आहे. संरक्षक कठडे नसल्याने येथे अनेक भीषण अपघात झाले असून काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
स्थानिक प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने, हरीश कामारकर यांनी उपरोधिकपणे गडकरींच्या कार्यतत्परतेचा दाखला दिला आहे. 'तुम्ही येणार म्हटल्यावर प्रशासन खडबडून जागे होईल. आपल्या केवळ येण्याच्या बातमीनेच या पुलाचे आणि रस्त्याचे नशीब पालटेल. रखडलेले कठडे आणि पथदिव्यांचे काम तर साहेबांनाच साकडं युद्धपातळीवर पूर्ण होईल,' अशी भावनिक साद या तरुणाने पत्रातून घातली घालावं लागेल आहे.
एका बाजूला नितीन गडकरी देशभर रस्त्यांचे जाळे विणून "हायवे मॅन" म्हणून ओळखले जात असताना, त्यांच्याच जुन्या कामाकडे स्थानिक प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आता चव्हाट्यावर आले आहे. एका सामान्य नागरिकाला आपल्या भागातील पुलाच्या दुरुस्तीसाठी थेट देशाच्या कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारे पत्र लिहावे लागते, हे यंत्रणेचे अपयश मानले जात आहे. आता या पत्राची दखल घेऊन गडकरी प्रशासनला काय आदेश देतात आणि या पुलाचे "भाग्य" खरोखरच उजळते का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
■ या अनोख्या पत्राबाबत बोलताना हरीश कामारकर म्हणाले की, 'आमच्या भागातील पुस नदीवरील पूल आज मृत्यूचा सापळा बनला आहे. संरक्षक कठडे नसल्याने निष्पाप लोकांचे जीव जात आहेत, पण स्थानिक प्रशासन सुस्त आहे. नितीनजी गडकरी साहेबांचा शब्द आणित्यांचा दौरा म्हणजे विकासाची गॅरंटी असते, हे आम्ही ऐकून आहोत. म्हणून, तक्रार करण्यापेक्षा आम्ही त्यांना प्रेमाचं निमंत्रण दिलं आहे. साहेब जेवायला आले, तर त्यांच्या स्वागतासाठी का होईना, पण हे प्रशासन रस्ते आणि पूल नक्कीच नीट करेल. जनतेचा जीव वाचवण्यासाठी यापेक्षा वेगळा मार्ग मला दिसला नाही." - हरीश कामारकर
*थेट केंद्रीय मंत्र्यांनाच साकडे • मृत्यूचा सापळा बनलेल्या पुलासाठी महागावच्या तरुणाचे मंत्र्यांना साकडे*

No comments:
Post a Comment