महात्मा फुले महाविद्यालय वरुड येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जागरूकता उपक्रम
प्रतिनिधी - हेमंत कोंडे
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड व पोलीस अधिक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण अंतर्गत पोलीस स्टेशन वरूड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२/१२/२०२५ शुक्रवार रोजी महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सुरक्षा याविषयीची जागरूकता हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय सातपुते, प्रमुख मार्गदर्शक श्री गोपीनाथ वाघमारे (सहाय्यक, पोलीस निरीक्षक वरूड), पोलिस कॉन्स्टेबल श्री अंकीश वानखेडे, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका सौ. अलका पवार, निलेश ठाकरे, जितेश खडसे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चत्रभुज कदम यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक गोपीनाथ वाघमारे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरूड) यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आजच्या डिजिटल युगामध्ये तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वाढलेली सायबर गुन्हेगारी याविषयी मार्गदर्शन केले. आपण दैनंदिन जीवनात मोबाईल मध्ये विविध प्रकारचे ॲप डाऊनलोड करतो, फेसबुक, इंस्टाग्रामवर चॅटींग करतो, सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरतो, विविध प्रकारच्या लिंक शेअर करतो त्यावेळी सावधानता बाळगणे गरजेचे असते. त्यामुळे ऑनलाइन फ्रॉड, हॅकिंग,सायबरस्टाकिंग, डाटा चोरी केली जाते. अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारीचे आज दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. यासाठी झेन जी मधील तरूणाईने वेळीच जागरूक राहिले पाहिजे. त्यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे टोल फ्री नंबर विद्यार्थ्यांना सांगितले. अशा घटना आपल्या सोबत किंवा परिसरात घडत असतील तर आमच्याशी नि: संकोचपणे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले. जर वाढत राहिले तर आपणासाठी मोठी चिंतेची बाब आहे, असे म्हटले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. संजय सातपुते यांनी आपण विदेशी ॲप न वापरता स्वदेशी ॲप वापराचे फायदे सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वाढत्या मोबाईल वापर, याविषयी जागरूक असणे आवश्यक आहे असे म्हटले. कार्यक्रमाचे संचालन पुनम नानोटकर तसेच आभार भाग्यश्री बुरंगे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment