धाणल्यात माकडाच्या हल्ल्यात १० वर्षीय विहान बोरकर गंभीर जखमी...



कुही : तालुक्यातील धानला गावात शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) रोजी घडलेल्या एका भयावह घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. विहान भोजराज बोरकर (वय १०) या निरागस बालकावर माकडाने केलेल्या हल्ल्यामुळे गावभर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या काका शेषराज बोरकर यांच्या घरी मंडई निमित्त आलेल्या विहानवर घरासमोर खेळत असताना अचानक एका माकडाने झेप घेत पंज्याने हल्ला केला. या हल्ल्यात विहानच्या मांडीवर खोल, रक्तस्त्राव करणारी गंभीर जखम झाली. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर सध्या त्याच्यावर घरी उपचार सुरू असून, तो तीव्र वेदना सहन करीत आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून धानला परिसरात माकडांचा उपद्रव झपाट्याने वाढत असून, गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे. अलीकडील काळात गावागावात माकडांच्या वावर वाढला असून माकडे आता धीट झाली आहेत. चालत्या गाडीवर उडी मारणे, टू व्हीलरवाल्यांना रस्ता न देणे, चालत जाणाऱ्या माणसावर हल्ला करणे या सर्व कारणांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक भयभीत आहेत. माकडे घरांच्या छपरांवर बसून वस्तू उडवतात, अंगणात खेळणाऱ्या मुलांवर झेप घेतात, शेतातील पीक नष्ट करतात. तरीही वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप उसळला असून, त्यांनी विहान बोरकरच्या उपचारासाठी शासकीय मदतीची मागणी केली आहे. जखमी बालकाला तातडीने आर्थिक मदत जाहीर करून उपचाराचा पूर्ण खर्च शासनाने उचलावा तसेच माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तात्काळ मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात येत आहे.

आज विहानवर हल्ला झाला, उद्या आणखी कुण्या एखाद्या बालकावर झाला तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागात माकडांचा उपद्रव वाढत असताना वनविभाग मात्र केवळ फाईलांवर कारवाई दाखवण्यात व्यस्त आहे. विहानच्या जखमेतील वेदना ही केवळ एका बालकाची नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेची खोल जखम आहे. वनविभागाने आता तरी जागे होऊन माकड पकड मोहीम सुरू करावी व नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा, अशी जनतेची मागणी आहे.

No comments:

Post a Comment