सोनपुरी रस्ता उध्वस्त; डांबर उडालं, गिट्टी उखडली!



अवघा १ किमी मार्ग,पण खड्ड्यांच्या महासापळ्यात ग्रामस्थ त्रस्त


स्वप्नील खानोरकर

पचखेडी : कुही तालुक्यातील वेलतूर सर्कल व शिकारपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सोनपूरी गावाकडे जाणारा एकमेव रस्ता अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. ठिकठिकाणी खोल खड्डे, गिट्टी उखडलेली, डांबर गायब आणि उरलंसुरलं फक्त रस्त्याचं निशाण! प्रवाशांसाठी हा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरत आहे.राज्य महामार्गावरील खैरलांजी गावापासून अवघ्या एका किलोमीटरचा हा रस्ता असून ग्रामस्थांसाठी तोच जीवनरेषा आहे. पण या जीवनरेषेवर आता खड्ड्यांचे साम्राज्य बसले आहे. पावसाने ही खड्डी डबक्यांत रूपांतरित झाली आहेत. वाहनचालकांना खोलपणाचा अंदाज घेता येत नाही, परिणामी प्रत्येक क्षणी अपघाताची टांगती तलवार डोक्यावर लटकते.

शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला—सर्वांचा प्रवास जीवघेणा बनला आहे. चारचाकी व दुचाकीस्वारांचे हाल अक्षरशः कंठशोषी झाले आहेत. पण तरीही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींच्या कानावर पानसुद्धा हललेले नाही! निवडणुका आल्या की गोड बोलायचं, नंतर ग्रामस्थांना खड्ड्यांत लोटायचं हीच पद्धत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.एका किलोमीटरच्या रस्त्यासाठी इतकी वर्षं ग्रामस्थांना खड्ड्यांच्या नरकयातना का भोगाव्या लागतात? हा प्रश्न आता थेट लोकप्रतिनिधींनाच विचारला जात आहे.ग्रामस्थांनी वारंवार निवेदनं दिली, मागण्या केल्या; पण फक्त आश्वासनांचा पाऊस पडला, डांबराचा थेंब मात्र पडला नाही. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा कैलास खडसिंगे, वैभव मते, सचिन मुटकुरे, सुरेश बांते, सुधीर मने यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment