अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय महाजन यांची निवड



राज्यभरातून होतोय कौतुकांचा वर्षाव..!


नगर प्रतिनिधी: 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्षपदी शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व साईश्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय विठ्ठल महाजन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत असून ग्रामीण पत्रकार चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.

या निवडीसाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, राष्ट्रीय सरचिटणीस अशोक पवार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने संजय महाजन यांच्यावर विश्वास दाखवला. पत्रकार बांधवांच्या समस्या, शासकीय कार्यालयांमधील अडचणी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे आवाज बुलंद करण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या जिल्हा पातळीवरील नेतृत्वाची धुरा महाजन यांच्या खांद्यावर सोपविल्याने संघटनात्मक कार्य अधिक जोमाने पुढे जाणार आहे.

सामाजिक कार्याची ओढ आणि पत्रकारितेबरोबरच लोकसंग्रहाची कला यामुळे संजय महाजन हे नेहमीच सामान्य जनतेच्या संपर्कात राहिले. त्यांच्या कार्याची झलक अनेक ठिकाणी दिसून येते. पोलीस मित्र संघटना, ग्रामीण पत्रकार संघ, बहुजन पत्रकार संघ आदी संघटनांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळत प्रभावी काम केले आहे. याशिवाय शिर्डीत साईश्रद्धा प्रतिष्ठान स्थापन करून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणविषयक विविध उपक्रम राबवले. विशेष म्हणजे, कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून पत्रकारिता करताना ते स्वतः बाधित झाले तरी जिद्दीने संकटावर मात करून नव्या उमेदीने समाजकार्यात सक्रिय झाले.

महाजन यांच्या निवडीबाबत विविध मान्यवर, पत्रकार बांधव तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. संघर्षातून घडलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व संघटनेला बळकटी देईल आणि ग्रामीण पत्रकारांच्या हक्कांसाठी त्यांचा आवाज अधिक ताकदीने पुढे येईल, अशा शब्दांत राज्यभरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment