रांजणगाव गणपतीतील तिहेरी हत्याकांडाच्या तपासाला वेग..!




विशेष पोलिस पथक तांत्रिक पद्धतीने शोध घेत असून नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे — पोलीस अधीक्षक संदीप गिल...


पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 


शिरूर:- रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे घडलेल्या संतापजनक तिहेरी हत्याकांडाचा तपास सध्या गतीने सुरू असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. या हत्याकांडात एका महिलेची आणि तिच्या दोन मुलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिरूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी आणि शिक्रापूर पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशाप्रकारे बेपत्ता झालेल्या महिला आणि त्यांच्या मुलांची माहिती घेतली जात आहे. तपासादरम्यान पोलिसांना अशाच प्रकारे बेपत्ता झालेल्या दोन महिलांचे व त्यांच्या मुलांचे पुरावे मिळाले होते. त्यानुसार पुढील तपास करत असताना, सदर मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही फूटेज व अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे.

गुन्ह्यातील महिला व मुलांचे फोटो राज्यभरातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठविण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांनी या फोटोवरून कोणतीही माहिती असल्यास ती तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील रिया हॉल येथे शिरूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांची विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी पोलीस पाटलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात माहिती मिळवण्याच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीचा वापर करून औद्योगिक क्षेत्रात आणि अन्य भागांतून तपास पुढे नेण्यावर भर देण्यात आला आहे.

तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्ह्याशी संबंधित माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यास त्या माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली आहे.


 संपर्कासाठी:

पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे – रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन

पोलीस अधीक्षक संदीप गिल – पुणे ग्रामीण पोलीस


 पोलिसांचे आवाहन:

जर आपल्याकडे या महिले व मुलांबाबत कोणतीही माहिती असेल, तर कृपया तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल. समाजाच्या सुरक्षेसाठी तुमचे सहकार्य मोलाचे आहे.

No comments:

Post a Comment