निमगाव भोगीतील प्रदूषणप्रश्नी शरद पवारांचा संतप्त सवाल : “शेती उद्ध्वस्त झाली, तर शेतकरी कसा जगायचा?”



राज्य शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी; १५ दिवसांत मुंबईत उच्चस्तरीय बैठक होणार – उद्योगमंत्री उदय सामंत

शिरूर,एमआयडीसीमधील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीमुळे निमगाव भोगी (ता. शिरूर) व परिसरातील जमिनी नापीक झाल्या असून, पाण्याचे स्रोतही गंभीरपणे दूषित झाल्याच्या स्थानिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह गुरुवारी प्रत्यक्ष भेट देऊन भर उन्हात शेतजमिनीची पाहणी केली.“शेती उद्ध्वस्त झाली तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा संतप्त सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. राजकारण न करता या समस्येवर राज्य शासनाने तातडीने तोडगा काढावा, असे स्पष्ट आवाहनही त्यांनी केले.


प्रदूषणामुळे भीषण परिणाम :

शरद पवार म्हणाले, “प्रदूषण पसरविणाऱ्या कंपनीमुळे स्थानिकांचे जीवनमान खालावले आहे. नागरिक आजारी पडत आहेत, रोगराई पसरते आहे. हे चित्र बदलण्यासाठी राज्य शासनाने जबाबदारीने पावले उचलली पाहिजेत. यासंबंधी मुंबईत होणाऱ्या बैठकीत आम्ही ठोस निर्णय घेऊ, याची काळजी मी घेतो.”


स्थानिकांची प्रमुख मागणी :

1] MEPL कंपनी कायमस्वरूपी बंद करावी.


2] कंपनीला दिलेले वाढीव क्षेत्र रद्द करावे.


3] प्रदूषणामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी.


4]नष्ट झालेल्या पिकांची व जनावरांची भरपाई मिळावी.


5] पुढील प्रकल्प तहकूब करावेत.


उद्योगमंत्री उदय सामंत यांची भूमिका :

“या भागातील प्रदूषणाचे गांभीर्य आम्ही समजून घेतले आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची हमी मी देतो. येत्या १५ दिवसांत मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन ठोस तोडगा काढला जाईल,” असे उदय सामंत यांनी सांगितले.


खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी :

“शासनस्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. MEPL कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले पाहिजे, त्यासाठी स्पष्ट आदेश द्यावेत,” अशी ठाम भूमिका डॉ. कोल्हे यांनी मांडली.


या दौऱ्यात उपस्थित मान्यवर :

खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, अशोक पवार, देवदत्त निकम, विकास लवांडे, शेखर पाचुंदकर, विश्वास ढमढेरे, बापूसाहेब शिंदे, राहुल पाचर्णे, शशिकांत दसगुडे, विक्रम पाचुंदकर, दादा पाटील घावटे, अमोल वर्षे, निमगावच्या सरपंच ज्योती सांबारे, माजी सरपंच उत्तम व्यवहारे, अंकुश इचके, कर्डेलवाडीच्या सरपंच लता कर्डिले, सरदवाडीच्या सरपंच लक्ष्मी जाधव, अण्णापूरचे उपसरपंच डॉ. संतोष शिंदे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रशासकीय अधिकारी व यंत्रणा सहभागी :

अर्चना पठारे (उपअभियंता), मिलिंद कासार, जगन्नाथ साळुंखे (प्रदूषण नियंत्रण मंडळ), विनय कौलवकर (नायब तहसीलदार), महेश डोके (गटविकास अधिकारी), सुवर्णा आदक (तालुका कृषी अधिकारी) यांनी पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.


शेतकऱ्यांचे आरोग्य, शेती आणि जीवनमान सुरक्षित ठेवणे हे शासनाचे कर्तव्य आहे. आता हा लढा राजकीय नसून जीवनाच्या हक्कासाठी आहे, याची जाणीव शासनाने ठेवावी, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment