पंचवीस वर्षांपासूनच्या रस्त्याच्या वादावर अखेर पडदा ; तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मध्यस्थीने वादी-प्रतिवादींमध्ये सलोखा
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
मरळगोई बुद्रुक येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वहिवाट रस्त्याच्या वादावर अखेर तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा निघाला. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या पुढाकारामुळे वादी व प्रतिवादी यांच्यात सामंजस्य निर्माण होऊन वाद मिटल्याने गावात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ च्या कलम ५ अंतर्गत दाखल असलेल्या वहिवाट केस क्र. ४३/२०२५ मध्ये वादी दामोदर त्र्यंबक जगताप यांनी रस्त्याबाबत दावा दाखल केला होता. या प्रकरणात मनुबाई रामकृष्ण जगताप, मथुराबाई रामसाहेब गडाख, पुष्पाबाई मच्छिंद्र जाधव, माणिक त्र्यंबक जगताप, सुमनबाई दामोदर जगताप, महेश पोपट जगताप व भागीरथीबाई पोपट जगताप हे प्रतिवादी होते.
प्रकरणाच्या अनुषंगाने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण केले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी कमलेश पाटील, कोतवाल किशोर गाडे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व मध्यस्थ निवृत्ती जगताप आणि पंडित मुदगुल उपस्थित होते. स्थळ निरीक्षणा दरम्यान दोन्ही बाजूंची मते ऐकून घेण्यात आली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादामुळे संबंधित कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र तहसीलदार नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा घडून आली. त्यातून सर्व संबंधितांनी परस्पर सहमतीने आपापल्या गटातून जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे न्यायालयीन लढाई ऐवजी संवाद आणि सामंजस्याच्या माध्यमातून प्रश्न निकाली निघाल्याने वादी व प्रतिवादी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी यावेळी शांतता, सलोखा आणि परस्पर सहकार्याची भावना जपण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत करून प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

No comments:
Post a Comment