दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; नरेंद्र नगर पुलाखाली आता पाणी साचणार नाही
(नागपूर प्रतिनिधी : निलेश काळे)
नागपूर : नरेंद्र नगर रेल्वे पुलाखाली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या समस्येमुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन वर्षांपूर्वी एमआरव्ही कंपनीद्वारे कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र निधीची उपलब्धता, विविध विभागांच्या ना-हरकत प्रमाणपत्रांची (NOC) प्रक्रिया तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले होते. या प्रकरणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून पुलाखाली साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी ४० हॉर्स पॉवर क्षमतेच्या तीन पंप मशीन बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याची माहिती देण्यात आली.
मनसेचे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे तसेच दक्षिण-पश्चिम नागपूरमधील मनसे कार्यकर्त्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा परिणाम म्हणून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.
शनिवार, १३ जून २०२६ रोजी मनसे शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या हस्ते बटण दाबून पाणी उपसा यंत्रणेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे पुलाखाली साचलेले पाणी यंत्रणेमार्फत कशा प्रकारे बाहेर काढले जाईल, याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कुर्वे, एमआरव्ही कंपनीचे संचालक तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पावसाळ्यातील दीर्घकालीन समस्येवर कायमस्वरूपी उपाय झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:
Post a Comment