पावसाळ्यापूर्वी विद्युत यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट करा



 अनसिंगमधील धोकादायक वीज यंत्रणा तातडीने दुरुस्त करा : महावितरणला निवेदन

नारायण सातव अनसिंग, प्रतिनिधी :-  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनसिंग व परिसरातील जीर्ण व धोकादायक विद्युत यंत्रणेमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण यंत्रणेची तातडीने दुरुस्ती, देखभाल व सुरक्षा ऑडिट करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते यश सतीश चव्हाण यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी ( ता. २ ) मंगळवारी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, अनसिंग परिसरात दरवर्षी पावसाळा सुरू होताच वीजपुरवठ्याच्या समस्या उद्भवतात. अनेक ठिकाणी वीज खांबांना करंट येणे, तुटलेल्या व जीर्ण झालेल्या तारा, झाडांच्या फांद्या तारांवर पडणे या घटना घडतात. हलका पाऊस किंवा वादळी वारा आला तरी तासन्तास वीजपुरवठा खंडित होतो. महावितरणकडून वेळेवर देखभाल न झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

येथील अनेक वीज खांब, रोहित्र आणि तारा जीर्ण अवस्थेत आहेत. काही खांबांना करंट येण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होऊन नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, लहान मुले व जनावरे यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे चव्हाण यांनी नमूद केले.

खंडित वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा विस्कळीत होऊन पिकांचे नुकसान होते. व्यापारी व व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. तुटलेल्या, सैल झालेल्या तारा, खराब इन्सुलेटर आणि झुकलेल्या खांबांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

पावसाळ्यापूर्वी महावितरणने विशेष मोहीम राबवून संपूर्ण विद्युत यंत्रणेची सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश आहे:

 सर्व वीज खांबांची तपासणी करून करंट येत असल्यास तात्काळ उपाययोजना करणे, तुटलेल्या व जीर्ण तारांची दुरुस्ती करून आवश्यकतेनुसार नवीन तारा बसविणे , झुकलेले व धोकादायक खांब तातडीने बदलणे , रोहित्र व अर्थिंग तपासून दोष दूर करणे , विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे , वारंवार बिघाड होणारे रोहित्र व इतर उपकरणे दुरुस्त करणे किंवा बदलणे , संपूर्ण विद्युत यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट करणे , वादळ-वाऱ्यामुळे वीज खंडित होऊ नये यासाठी तांत्रिक उपाययोजना करणे , नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करणे 

संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नियमित तपासणी व देखभाल गरजेची आहे. पावसाळ्यात निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागू नये, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा जनहितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा यश चव्हाण यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment