उर्दू माध्यमाच्या नववी वर्गासाठी मुस्लीम समाजाचा एल्गार; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा”
जळगाव जिल्हा एकता संघटनेचे महापौर व अतिरिक्त आयुक्तांना निवेदन; शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट
प्रतिनिधि फजल शेख
जळगाव : जळगाव महानगरपालिका हद्दीतील मुस्लीम बहुल व आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांमध्ये उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप जळगाव जिल्हा एकता संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने महापौर दीपमाला काळे आणि अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांना निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेने दिलेल्या निवेदनात पिंपराळा हुडको, शिवाजीनगर हुडको, गेंदालाल मिल परिसर, पिंपराळा गाव आणि अक्सा नगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम समाजातील विद्यार्थी वास्तव्यास असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र या भागांमध्ये महानगरपालिकेकडून केवळ प्राथमिक अथवा आठवीपर्यंतच उर्दू माध्यमाच्या शाळा चालवल्या जात असल्याने आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नववीत प्रवेशासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.खासगी शाळांमध्ये मर्यादित जागा आणि वाढते शुल्क यामुळे अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ येत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
यावेळी मनपा शिक्षण विभागातील गंभीर समस्या देखील समोर आणण्यात आल्या. मनपा शाळांमध्ये तब्बल 54 शिक्षकांची पदे रिक्त असून 8 मुख्याध्यापक पदे देखील भरलेली नाहीत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यल्प असल्याने दोन सत्रांमध्ये वर्ग चालवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी प्रशासनाला थेट इशारा देताना सांगितले की,
“विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा केवळ फाईलपुरता मर्यादित ठेवण्याचा विषय नाही. मनपाने तातडीने उर्दू माध्यमाची नववी सुरू करून रिक्त शिक्षक व मुख्याध्यापक पदे भरावीत. अन्यथा जळगाव जिल्हा एकता संघटना रस्त्यावर उतरून तीव्र लोकआंदोलन छेडेल.”
या वेळी नगरसेवक शोएब खाटीक, हाफिज रहीम पटेल, मौलाना गुफ्रान, मौलाना इमरान काकर, मतीन पटेल, मजहर खान, अन्वर शिकलगार, जकी पटेल, सलीम इनामदार, ताहेर शेख, अब्दुल रऊफ, आरिफ देशमुख, अख्तर शेख, वसीम शेख, मुजाहिद खान आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment