श्री संत अवलिया बाबा खडसिंग यांच्या मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित
नारायण सातव अनसिंग , प्रतिनिधी :-
येथून जवळच असलेल्या खडसिंग येथे श्री संत अवलिया बाबा यांच्या मंदिरात तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या पवित्र सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात ( ता.१२ ) मंगळवारी होम, हवन आणि जलाभिषेकाने करण्यात आली आहे. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी वातावरण भक्तिमय झाले असून
( ता .१३ ) बुधवारी मंदिरातील स्थापित मूर्तींचा धान्याभिषेक करण्यात येणार आहे. त्याच दिवशी रात्री ८.०० ते १०.०० या वेळेत वैराग्यमूर्ती ह.भ.प. बाबुरावजी महाराज तडसे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यांच्या प्रवचनातून अध्यात्म, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे.
या तीन दिवसीय सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम (ता.. १४ ) गुरुवारी पार पडणार आहे. यामध्ये मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा, मंदिराचा कळसारोहण सोहळा तसेच भव्य कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व विनोदाचार्य ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर यांचे सकाळी १०.०० ते १.०० या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे.
कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र आणि भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:
Post a Comment