निफाड तालुक्यात प्रशासनाचा मोठा धडाका!
तब्बल ५० वर्षांनंतर चितेगाव-चेहेडी शिव रस्ता अतिक्रमणमुक्त
निफाड / गणेश ठाकरे
निफाड तालुक्यातील चितेगाव ते चेहेडी दरम्यानचा तब्बल ५० वर्षांपासून प्रलंबित आणि बंद असलेला शिव रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. महसूल प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून शुक्रवार, दि. १५ मे रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. पाच दशकांनंतर हा मुख्य रस्ता मोकळा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि भूमी अभिलेखचे उपाधीक्षक राजेंद्र भाबड यांच्या थेट आदेशानुसार ही विशेष मोहीम आखण्यात आली होती. कोणताही वाद न होऊ देता ही कारवाई पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी जयंत लिलके यांनी संबंधित शेतकऱ्यांची पूर्वबैठक घेऊन रस्त्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे शशिकांत बैरागी यांनी तातडीने रस्त्याच्या हद्दी व अधिकृत खुणा निश्चित केल्या.
प्रशासनाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कारवाई करत सुमारे १ किलोमीटर लांबीचा आणि ९ मीटर रुंदीचा शिव रस्ता पूर्णपणे अतिक्रमणमुक्त केला. अनेक दशकांपासून हा रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी व दैनंदिन शेतीकामासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. आता हा रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांची वाहतूक सोपी होणार असून, दोन्ही गावांमधील ग्रामसंपर्क अधिक दृढ होणार आहे.
या मोहिमेमध्ये ग्राम महसूल अधिकारी शेखर पाटील, अबोली साळवे, कैलास अहिरे, पूर्वा राठोड, पोलीस हवालदार जाधव, स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी आणि तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ रूमणे यांनी सक्रिय सहकार्य केले. कारवाई दरम्यान दोन्ही गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चितेगाव-चेहेडी शिव रस्ता प्रशासनाने अत्यंत सकारात्मक समन्वयातून खुला केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होईल आणि ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला गती मिळेल. लोकहिताचा हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो. आ.श्री. दिलीप काका बनकर

No comments:
Post a Comment