कळमनुरीत ५४ किलो गोमांस जप्त; दोघे ताब्यात, गुन्हा दाखल



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

 कळमनुरी येथे अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्रीसाठी वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत ५४ किलो गोमांस जप्त केले असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ९ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास करण्यात आली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरातील नाईकवाडी मोहल्ला परिसरात गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी रवि नारायण इंगोले यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत इलियास अहमद कासिम कुरेशी व शेख निसार शेख इकबाल कुरेशी, दोघेही रा. नाईकवाडी मोहल्ला, कळमनुरी यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून ५४ किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १२ हजार ९६० रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलीस तपासात आरोपींनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्रीसाठी वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रेम कुमार माकोडे करीत असून दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.


No comments:

Post a Comment