जेवल्या का तुम्ही…?” ४३ अंशांच्या उन्हात जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओझरकरांची मायेची सावली
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
सध्या राज्यभर सुरू असलेल्या जनगणना मोहिमेत शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कडक उन्हात घराघरांत जाऊन माहिती संकलनाचे काम करत आहेत. निफाड तालुक्यातील ओझर शहरात तब्बल ४३ अंश सेल्सिअस तापमानात सुरू असलेल्या या कामादरम्यान एक असा प्रसंग घडला, ज्याने जनगणना मोहिमेला माणुसकीची ऊब मिळाली.
माधवराव बोरस्ते विद्यालयाच्या शिक्षिका शताक्षी पुरकर आणि सीमा भामरे या दोघी जनगणनेच्या कामासाठी दुपारच्या उन्हात घराघरांत फिरत होत्या. हातात कागदपत्रे, चेहऱ्यावर उन्हाचा ताण आणि सततच्या धावपळीमुळे थकवा स्पष्ट जाणवत होता. अशात त्या ओझरमधील एका साध्या घरासमोर पोहोचल्या. दार उघडताच समोर आलेल्या माऊलीने कोणतीही माहिती विचारण्याआधी प्रेमाने पहिला प्रश्न विचारला “ताई, जेवल्या का तुम्ही…?” क्षणभर दोन्ही शिक्षिका नि:शब्द झाल्या. जनगणनेच्या कामात दिवसभर लोकांची माहिती घेत फिरताना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून एवढ्या आत्मीयतेने विचारपूस होईल, अशी अपेक्षा नव्हती. त्या माऊलीने पुढे पाण्याचा ग्लास देत, “इतक्या उन्हात काम करता, आधी थोडं बसा,” अशीही आपुलकीने विनंती केली.
“दिवसभर उन्हात फिरून खूप थकलो होतो; पण त्या एका प्रश्नानेच सगळा थकवा निघून गेला. खरं तर पुढे जाऊन जेवण करणार होतो, पण त्या माऊलीच्या मायेनेच पोट भरलं,” अशी भावना शिक्षिका शताक्षी पुरकर आणि सीमा भामरे यांनी व्यक्त केली.
जनगणना म्हणजे केवळ आकडेवारी गोळा करण्याचे काम नसून समाजातील माणुसकी, आपुलकी आणि परस्परांतील जिव्हाळा अनुभवण्याची संधी असल्याचेही या प्रसंगातून अधोरेखित झाले. ओझर शहरातील नागरिकांकडून जनगणना मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी कर्मचारी वर्गाचे पाणी देऊन, सावलीत बसवून स्वागत केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेबद्दल प्रशासन स्तरावरही समाधान व्यक्त करण्यात आले. सुमारे ४३ अंशांच्या तापमानात सुरू असलेल्या या मोहिमेत ओझरकरांनी दाखवलेली माणुसकी आता जनगणनेइतकीच चर्चेचा विषय ठरत आहे. एका साध्या प्रश्नातून व्यक्त झालेली माया प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारी ठरत आहे.
• कडक उन्हातही कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि नागरिकांकडून मिळणारे सहकार्य व आत्मीयता ही जनगणना मोहिमेची खरी ताकद आहे.विशाल नाईकवाडे तहसीलदार, निफाड

No comments:
Post a Comment