नगरपंचायत चा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिक पणे होणार :-- मुख्याधिकारी राठोड



मानोरा : प्रतिनिधी (जगदीश राठोड) 

नगरपंचायत प्रशासनाचा कारभार ढेपाळल्याच्या तक्रारी काही नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध कल्याणकारी योजना निष्पक्ष पद्धतीने राबविण्याचा प्रामाणिक हेतू असल्याचे मत मुख्याधिकारी उमेश राठोड यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

मुख्याधिकाऱ्यांची भूमिका

गतवर्षी रुजू झाल्यापासून नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, विकास कामे पारदर्शक पद्धतीने व्हावीत हा कटाक्ष असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. "मी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून नागरिकांची कामे करण्यास प्राधान्य देतो. काही प्रशासकीय दौरे, जिल्हा स्तरावरील बैठका व क्षेत्रीय पाहणी यामुळे कधीकधी कार्यालयात अनुपस्थिती असते, मात्र त्याची पूर्वकल्पना दिली जाते," असे त्यांनी सांगितले.

मुख्याधिकारी राठोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या कामांची माहिती दिली.

 शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्यांचे रूट निश्चित करून नियमित उचल करण्याचे नियोजन आहे.

मुख्य रस्त्यांवरील बंद पथदिवे दुरुस्त करून एलईडी पथदिवे बसवण्याची प्रक्रिया सुरू केली.

 पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करून कामांना गती दिली.

नगरसेवकांनी केलेल्या गैरहजेरीच्या आरोपावर बोलताना राठोड म्हणाले, "प्रत्येक फाईल नियमानुसार तपासूनच मंजूर केली जाते. त्यामुळे काही वेळा विलंब होतो. मात्र हेतुपुरस्सर कामे अडवली जात नाहीत. पारदर्शक कारभारासाठीच मी ई-ऑफिस प्रणालीवर भर देत आहे. सर्व कामकाज ऑनलाईन केल्यास नागरिकांनाही स्थिती समजेल."

प्रत्येक विकास कामाची रक्कम, कामाची मुदत दर्शवणारे फलक लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली."नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अडचण असल्यास थेट कार्यालयात भेटावे. प्रामाणिकपणे सेवा देणे हेच माझे कर्तव्य आहे," असे आवाहन मुख्याधिकारी उमेश राठोड यांनी शेवटी केले.नगरपंचायत प्रशासन व नगरसेवक यांच्यातील समन्वयातून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



No comments:

Post a Comment