शाश्वत गो सेवा करा, गोमातेप्रमाणे जगा; सेंद्रिय शेतीतून निसर्गाशी नाते जोडा” – ह.भ.प. योगीराज महाराज कानळदेकर
सोयगाव प्रतिनिधी...दिलीप मोरे...
सोयगाव, दि.१४– आरोग्यदायी जीवन आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्यासाठी गोसेवेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गोमातेची शाश्वत सेवा करा आणि गोमातेप्रमाणे साधे, निसर्गाशी जोडलेले जीवन जगा; त्यातून जीवनात शाश्वत अनुभव मिळतो, असे प्रतिपादन ह.भ.प. योगीराज महाराज कानळदेकर यांनी केले.
सोयगाव येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचलित अंजनाई गोशाळेच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी योगीराज महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण व गोमातेचे पूजन करण्यात आले.
योगीराज महाराज पुढे म्हणाले की, गोमातेचे शेण व गोमूत्र यांचा वापर करून सेंद्रिय शेती केल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि शेतीला भरभराट मिळते. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत आल्यामुळे निसर्गही आपले खरे रूप दाखवत असल्याचे त्यांनी नमूद केले. गोसेवक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोतस्करांच्या तावडीतून सोडवलेल्या अनेक गाई गोशाळेत आणल्या जातात. मात्र त्यांना आधी दिलेल्या इंजेक्शनमुळे काही वेळा त्या दगावतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हाणे यांनी अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी गोमातेच्या शेणापासून बनविलेल्या गौऱ्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. ज्यांना या गौऱ्यांची गरज असेल त्यांना प्रतिष्ठानतर्फे मोफत उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगीराज महाराज कानळदेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. यू.टी. गुट्टे, गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, नायब तहसीलदार काकासाहेब सावळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पवार, मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हाणे, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, आमखेडा सरपंच नंदा आगे, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख दिलीप मचे, कुणाल राजपूत आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी गोशाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत ९० गोवंश दाखल झाल्याची माहिती देत चार वर्षांचा आढावा मांडला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव दिलीप शिंदे, सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे, अनिल लोखंडे, कोषाध्यक्ष सौ. उर्मिला इंगळे, सौ. रुपाली लोखंडे, सौ. मिनाबाई गाडेकर, सौ. पद्माबाई शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि गोप्रेमींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी मानले.

No comments:
Post a Comment