वनक्षेत्रातील अवैध वाळू उत्खननावर वनविभागाचा मोठा प्रहार; ट्रॅक्टर जप्त, मालकावर गुन्हा



सोयगाव प्रतिनिधी..दिलीप मोरे..

सोयगाव वनपरिक्षेत्रातील जंगल भागातून मातीमिश्रित वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाने शनिवारी (दि.१४) कारवाई करत वाहन जप्त केले असून ट्रॅक्टर मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वनक्षेत्रातून गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

वन विभागाच्या पथकाला वेताळवाडी पश्चिम येथील वनकक्ष क्रमांक ४८२, गट क्रमांक ८१ या परिसरात एका ट्रॅक्टरद्वारे मातीमिश्रित वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली.

या वेळी बिगर क्रमांकाचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली (चेसीस क्रमांक १०००९४६८ ऐके) पकडण्यात आले. तपासात हे वाहन सोयगाव येथील गोपाल सदाशिव इंगळे यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले. संबंधित व्यक्ती परवानगीशिवाय गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध नियमानुसार वनगुन्हा नोंद करण्यात आला.

कारवाईदरम्यान जप्त केलेले वाहन सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोयगावचे वनपाल पी. डी. कोळी करीत आहेत.

ही कारवाई वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने आणि सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये वेताळवाडी पश्चिमचे वनरक्षक धोत्रे, सोयगावचे वनरक्षक चौधरी, वेताळवाडी पूर्वचे वनरक्षक सनान्से तसेच जरंडीचे वनरक्षक तडवी यांच्यासह वनकर्मचारी सहभागी होते.

No comments:

Post a Comment