भरवस फाटा येथील पेट्रोल पंपांवर शुकशुकाट



 अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे आवाहन


प्रतिनिधी . गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुक्यातील भरवस फाटा व सर्व परिसरात गेल्या काही तासांपासून पेट्रोल पंपांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर 'पेट्रोलचा साठा संपणार' अशा पसरलेल्या अफवेमुळे नागरिकांनी सकाळपासूनच पंपांवर तुफान गर्दी केली होती. परिणामी, दुपारपर्यंत सर्व पंपांवरील पेट्रोलचा साठा संपुष्टात आला आहे.

आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून पेट्रोल पुरवठा खंडित होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. या भीतीपोटी वाहनधारकांनी भरवस फाटा येथील पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लावल्या. गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरून घेण्याच्या चढाओढीमुळे पंपांवरील साठा काही तासांतच संपला. सध्या पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने 'पेट्रोल संपले' असे फलक लावण्यात आले असून परिसरात शांतता पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर निफाडचे तहसीलदार श्री. विशाल नाईकवाडे यांनी परिस्थिती स्पष्ट करत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.सोशल मीडियावर पसरणारे मेसेजेस चुकीचे असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.इंधनाचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार असून प्रशासनाकडून त्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

अनावश्यक गर्दी करून साठा करू नका, जेणेकरून सर्वांना इंधन उपलब्ध होईल.नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


" तालुक्यात इंधनाचा तुटवडा नाही, केवळ अफवेमुळे नागरिकांनी एकाच वेळी गर्दी केल्याने साठा संपला आहे. लवकरच पेट्रोल पुरवठा पूर्ववत होईल. कृपया कोणीही अफवा पसरवू नये आणि त्यावर विश्वासही ठेवू नये."-विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड.






No comments:

Post a Comment