महाडचा छबिना: सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव

 


संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

महाड: महाशिवरात्रीपासून सुरू झालेला श्री देव विरेश्वर महाराज मंदिर येथील पारंपरिक छबिना उत्सव शहरात भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे अनोखे वातावरण निर्माण करत आहे. भव्य, पवित्र आणि रोमांचक स्वरूपाच्या या उत्सवासाठी परिसरातील गावोगावचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून मंदिर परिसर सतत गर्दीने फुलून गेला आहे.

उत्सवानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार आणि कुटुंबीय एकत्र येत असल्याने देवदर्शनासोबतच गाठीभेटी, विचारपूस आणि सामाजिक संवादाला नवी उभारी मिळत आहे. या निमित्ताने समाजातील ऐक्य दृढ होत असून परंपरा आणि आधुनिक सामाजिक नातेसंबंध यांची सुंदर सांगड घातली जात आहे.

मंदिरात समया लावून शिवपिंडीवर देवाचा मुखवटा प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. भजन-कीर्तनाच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. एकादशी निमित्त दीप पूजन, बैठक, गादी पूजन, वही पूजन, प्रधान कलश पूजन आणि गणेश पूजन विधिवत पार पडले. देवळातील सर्व देवदेवतांना हार, फुले व फळे अर्पण करून गाऱ्हाणे घालण्यात आले. श्री देव विरेश्वर महाराजांवर अभिषेक करण्यात आला असून अखंड घंटानाद आणि जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. भक्तांची अलोट गर्दी उसळल्याने मंदिर परिसरात दिवसभर उत्साहाचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रंगीबेरंगी खेळणी, मेवा-मिठाई, कपडे, गृहउपयोगी साहित्य, सजावट साहित्य, सौंदर्य प्रसाधने, करमणुकीचे खेळ आणि विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांनी जत्रेचे स्वरूप धारण केले आहे. खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून स्थानिक व्यापाराला लक्षणीय चालना मिळाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, या कालावधीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने उत्सव आर्थिक दृष्ट्याही महत्त्वाचा ठरत आहे.


सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा छबिना उत्सव महाडकरांसाठी आनंद, समाधान आणि नवचैतन्य देणारा ठरत असून परंपरेची समृद्ध परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सोहळा म्हणून ओळखला जात आहे.


No comments:

Post a Comment