एम. एम. ए. सी.ई. टी. पी. यांच्या सहकार्याने अक्षरगंगा प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न
पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
बिरवाडी (ता. महाड) : एम. एम. ए. सी.ई. टी. पी. यांच्या सहकार्याने अक्षरगंगा प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रशाळा कांबळे तर्फे बिरवाडी येथे यशस्वीरित्या पार पडली. केंद्रातील इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या एकूण ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा किटसह उत्साहात सहभाग नोंदविला.
या परीक्षेसाठी लागणारे परीक्षा किट व परीक्षा शुल्क मिळून एकूण ६५०००/- रुपयांची आर्थिक मदत एम. एम. ए. सी.ई. टी. पी. MIDC महाड यांनी दिली. गेली पाच वर्षे ही संस्था सातत्याने या गुणवत्ता उपक्रमाला आर्थिक पाठबळ देत आहे.
या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख तथा बिरवाडी बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुधीर सकपाळ यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम नियमितपणे राबविला जात आहे. सध्याच्या तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा, त्यांच्या बौद्धिक क्षमतेत व गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू असल्याचे विस्तार अधिकारी सुधीर सकपाळ यांनी आपल्या प्रस्ताविकात नमूद केले.
या शुभेच्छा कार्यक्रमास एम. एम. ए. सी.ई. टी. पी.चे अध्यक्ष श्री अशोक तलाठी, कार्यक्रम अधिकारी निखिल भोसले, कांबळे-बिरवाडी गावचे सरपंच श्री सुनील देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर सकपाळ, परीक्षा समन्वयक सतीश राणीम, पोलीस मित्र ललित म्हात्रे, केंद्रसंचालक नागनाथ कोळेकर, संजेश साळुंखे तसेच परीक्षक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष श्री अशोक तलाठी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सुट्टीच्या दिवशीही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहिले, यामागे त्यांची आत्मीयता दिसून येते. या उपक्रमाचा निश्चितच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातही या उपक्रमासाठी संस्थेचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन श्री संजेश साळुंखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री सतीश राणीम यांनी मानले.

No comments:
Post a Comment