राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दोन गटात वाद व हाणामारी
प्रतिनिधी - नवनाथ घावटे
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे काल दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान बस स्थानक परिसरात तरुणांच्या दोन गटात वास झाला त्यावेळी एका गटाकडून गावठी पिस्तूल दाखवून धमकविण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज दि. १७ नोव्हेंबर रोजी ब्राह्मणी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत सदर घटनेचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला.
तालुक्यातील ब्राह्मणी येथे काल दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रीच्या दरम्यान बस स्थानक परिसरात परिसरात तरुणांच्या दोन गटात वाद झाला होता. दरम्यान एका गटाने गावठी कट्टा दाखवून धमकाविल्याचा आरोप करुन सदर गुंडांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. सदर घटनेची माहिती समजताच आज दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी शेकडो तरुण व ग्रामस्थ ब्राम्हणी येथील जुने बाजारतळ येथे एकत्र आले. अनेकांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत अवैध व्यवसाय व पोलिस प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांचे अवैध व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष असून पोलिस कर्मचारी व अवैध व्यावसायिक एकाच गाडीवर फिरत असल्याचा जाहीर आरोप गावऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यां समोर केला. यापूर्वी देखील अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी सर्व सामान्य कुटुंबातील सात ते आठ तरुणांना दमबाजी करून मारण्याचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस गाव गुंडांची हिम्मत वाढत असून गावात अशांतता आहे. पोलिसांनी वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर, अवैध व्यवसायिकांची हिंमत वाढली नसती, असा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रसंगी जो पर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी येत नाही, तो पर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय ठेगे यांनी तात्काळ ब्राम्हणी येथे धाव घेतली. ब्राह्मणी गावातील अवैध व्यवसाया विरोधात याच क्षणा पासूनच स्वतः लक्ष घालून संबंधितांना हद्दपार व तडीपार करणार असल्याची ग्वाही देत रात्रीच्या वादातील दोषींवर कारवाई करण्याचा इशारा संजय ठेंगे यांनी ग्रामस्थां समोर दिला. याशिवाय माध्यमिक शाळेसमोर टारगट तरुण मुलींना त्रास देत असल्याचे पालकांनी सांगितले. गावातील चर्चेनंतर पोलीस प्रशासन व पालकांनी शाळेत जावून शाळा प्रशासनाशी संवाद साधला. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या. यापुढे कोणत्या क्षणी पोलिसांची गाडी शाळा परिसरात फिरताना दिसेल. शाळेशी संबंध नसलेला व्यक्ती आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. असा इशारा ठेंगे यांनी दिला.
यावेळी सुरेश बानकर, रंगनाथ मोकाटे, विजय बानकर, माणिक तारडे, महेंद्र तांबे,शेखर मोकाटे, शांताराम हापसे, संजय मोकाटे, विश्वनाथ हापसे, माऊली राजदेव, महेश हापसे, भानूआप्पा मोकाटे, सुभाष गोरे, उमाकांत हापसे, बाबासाहेब गायकवाड, कृष्णा राजदेव, राजाबाबू हापसे, डॉ. काकासाहेब राजदेव, राम राजदेव, योगेश गोरे, राजेंद्र जाधव, सचिन सोनवणे, विजय राजदेव, गौरव हापसे, आदींनी चर्चेत भाग घेत मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

No comments:
Post a Comment