स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राजेंद्र नागवडेचा केविलवाणा प्रयत्न हास्यास्पद : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप नागवडे यांचा आरोप.



प्रतिनिधी । प्रा.अशोक राहिंज

श्रीगोंदा : माजी.मंत्री बबनराव पाचपुते हे श्रीगोंदा तालुक्याचे आमदार असताना त्यांनी इनामगाव-वांगदरी-ढोकराई रस्ता व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस व त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून २०२३-२४ मध्ये विशेष रस्ता दुरुस्ती (डठ) मधून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. तशी सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. स्वतःच्या गावच्या विकासात एक रुपयाचाही निधी न देऊ शकणारे राजेंद्र नागवडे यांनी अजितदादांना कुठलीही कल्पना न देता सरकारी कार्यक्रम नसताना, कुठलाही प्रोटोकॉल नसताना, विद्यमान आमदारांना निमंत्रण न देता केवळ स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अपूर्ण रस्त्याचे उद्घाटन करवून घेणे हास्यास्पद आहे असा आरोप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप नागवडे यांनी केला आहे. अजित दादा महायुतीचे असतानाही स्थानिक कोणत्याही लोकप्रतिनिधींना प्रकारची सूचना न देता व रस्त्याचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करणे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही संदिप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाडरे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांना पूर्व सूचना न देता खोटे बोलून उद्घाटन करायला लावले असावे असे वाटते. कारण हा कार्यक्रम शासकिय पत्रिकेत नव्हता, लोकप्रतिनिधींना न सांगता उद्घाटन करणे हे संयुक्तिक नाही आणि जर निधी त्यांनीच आणला असेल तर अपूर्ण कामाच्या उद्घाटनाची एवढी घाई का? असा सवाल ही संदीप नागवडे यांनी केला असून विद्यमान आमदार विक्रम दादा पाचपुते यांनीही याबाबतीत पत्रकार परिषदेद्वारे खुलासा करण्याची विनंती ही संदिप नागवडे यांनी केली आहे. 


No comments:

Post a Comment